18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रराज्य सरकार ऐकत नाही म्हणून राज्यपालांची भेट

राज्य सरकार ऐकत नाही म्हणून राज्यपालांची भेट

मुंबई : राज्यामध्ये कायदा-सुव्यवस्था आहे की नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात दिवसाढवळ्या सरपंचाची हत्या करण्यात आली. दुसरीकडे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस कोठडीत पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणांत राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप न्यायाधीशांच्या नावाची घोषणा झालेली नाही. राज्य सरकार ऐकत नाही, त्यामुळे अखेर राज्याचे घटनात्मक प्रमुख राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सर्वपक्षीय नेत्यांनी भेट घेतली, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली, त्यानंतर स्थानिक पोलिस आणि सीआयडीला देखील आरोपी सापडत नव्हते. हत्येचा मास्टरमाईंड तीन राज्ये फिरून आला, तरी राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणेला पत्ता लागला नाही. हत्येतील मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा स्वत: सीआयडीला शरण आला. मात्र अद्याप त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केलेला नाही.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय गुंतलेले आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा राज्यपालांनी घ्यावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांना मागणीचे निवेदन दिले.

यावेळी संभाजीराजे छत्रपती (मा. खासदार), बीडचे खासदार बजरंग सोनवणे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदिप क्षिरसागर, भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस, शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती विनायक मेटे, स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR