लातूर : प्रतिनिधी
लातूर केंद्रावर आठवडाभरापासून सुरु असलेली ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा ऐन मध्यावर आली असून रंगकर्मींच्या जल्लोषाने आणि नाट्य रसिकांच्या भरघोस प्रतिसादाने स्पर्धा उत्तरोत्तर रंगत आहे. यानिमित्ताने विविध विषय, आशय, शैलीच्या नाटकांतून रंगकर्मी आपला नाट्याविष्कार घडवित प्रेक्षकांची मने जिंकुन घेत आहेत.
येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृति सभागृहात दि. १७ नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा दि. ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता सुरु होणा-या प्रत्येक नाटकाला असलेली प्रेक्षकांची उपस्थिती त्यांचे नाट्यकलेवरील प्रेम दर्शवत आ.े त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सादरीकरणाचा खर्च, पारितोषीकांची रक्कम आणि अनेक पारितोषीके नव्याने वाढविल्याने राज्यातील विविध केंद्रांवर नाट्यसंघांची आणि रसिकांचीही गर्दी वाढली आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, आणि संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या लातूर केंद्रावरील स्पर्धा अत्यंत नियोजनपूर्वक पार पडत आहे. नव्याने रंगमंचावर येणा-या कलावंतांची संख्या आणि त्यांचे सादरीकरण लक्षणीय ठरत आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणुन चंद्रशेखर गोखले मुंबई, विवेक खेर नागपूर, अंजली पटवर्धन पुणे यांची शासनाने नेमणुक केली आहे. अधिकाधिक नाट्यरसिकांनी या नाट्यस्पर्धेचा नाट्यास्वाद घ्यावा, असे आवाहन स्पर्धेचे समन्वयक तथा ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे यांनी केले आहे.

