मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत खाते न उघडू शकलेल्या राज ठाकरे यांनी आता पुन्हा संघटनात्मक पातळीवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. मनसेमधील नवीन रचना आणि संघटनात्मक बदल आज जाहीर केले आहेत.
मनसेने पहिल्यांदाच मुंबईसाठी अध्यक्षपदाची नेमणूक केली आहे. त्याशिवाय, राज ठाकरे यांचे पुत्र, मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या एका बैठकीत राज ठाकरे यांनी नेत्यांना प्रमुख शहराच्या जबाबदा-या वाटून देणार असल्याचे सांगितले होते. तसेच नाशिक, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर मुंबईसाठीही अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहे. मुंबईतील विभाग अध्यक्षांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी मुंबई अध्यक्षावर असणार आहे.
मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांच्यानंतर ३ जिल्हा उपाध्यक्ष असणार आहेत. उपाध्यक्षांनंतर विभाग अध्यक्ष असणार आहेत. मनसेने आतापर्यंत मुंबईसाठी कधीही अध्यक्षांची नेमणूक केली नव्हती. आता मात्र थेट पहिल्यांदाच मुंबई अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनसेने आपल्या पक्ष संघटनेची सगळी रचना बदलली आहे. मनसेचे पहिले मुंबई अध्यक्षपद संदीप देशपांडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर, केंद्रीय समितीमध्ये विभाग अध्यक्षांची जबाबदारी नितीन सरदेसाई यांच्याकडे आहे. शाखा अध्यक्षांची जबाबदारी ही अमित ठाकरे यांच्याकडे असणार आहे. गटाध्यक्ष केंद्रीय समितीची जबाबदारी ही बाळा नांदगावकर यांच्याकडे असणार आहे.
मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांच्यानंतर कुलाबा ते माहीम-शीवपर्यंतची जबाबदारी उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, पश्चिम उपनगरची जबाबदारी शहर उपाध्यक्ष कुणाल माहिमकर, शहर उपाध्यक्षपदी असलेल्या योगेश सावंत यांच्याकडे पूर्व उपनगरची जबाबदारी असणार आहे.
मनसेच्या संघटनेत शिवसेनेप्रमाणे शाखा प्रमुख, शाखा अध्यक्ष ही महत्त्वाची पदे आहेत. त्यामुळे अमित ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.