मुंबई : प्रतिनिधी
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीमध्ये एकही जागा न मिळलेल्या मनसे पक्षावर अनेकांनी जोरदार टीका केली. मात्र गुढीपाडव्याला गाजलेल्या भाषणानंतर राज ठाकरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी तुफान भाषण करून सत्ताधारी व विरोधी नेत्यांवर आगपाखड केली. यावेळी त्यांनी राज्यातील मराठी भाषेच्या आग्रहावर जोर दिला. त्यांनी बँका, कार्यालये आणि आस्थापना येथे मराठी बोलली जात आहे की नाही यांची खात्री करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये मनसैनिक हे आक्रमक भूमिका घेऊ लागले. यानंतर आता राज ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असल्याचे दिसत आहे.
मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरामध्ये आंदोलन आणि आक्रमक भूमिका घेतली. तसेच अनेक बँकांमध्ये जाऊन मराठी बोलण्याचा आग्रह धरला. तसेच मराठी बोलणार नाही म्हणणा-या हिंदी भाषिकांना मनसे स्टाईल दणका देखील दिला. यामुळे राज ठाकरे यांना अखेर कार्यकर्त्यांना हे प्रकार थांबवण्याचे आदेश द्यावे लागले. मात्र हिंदी भाषिकांना त्रास दिल्यामुळे मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली जात आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबईत राहणारे आणि महाराष्ट्रात नोंदणीकृत राजकीय पक्ष उत्तर भारतीय विकास सेनाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्याविरोधात याचिका देखील दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ले करत असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा न बोलणा-या उत्तर भारतीयांविरुद्ध कथित द्वेषपूर्ण भाषण, लक्ष्यित हिंसाचार आणि धमक्यांसंबंधी अनेक प्रकरणांमध्ये कारवाईची मागणी करणारी याचिका मनसेविरोधात दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
अॅड. श्रीराम परक्कट यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सुनील शुक्ला आणि इतर हिंदी भाषिक लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणाचे अनेक खटले दाखल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासोबतच, मनसेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने द्यावेत अशी धक्कादायक मागणी करण्यात आली आहे. यामुळे आता मनसे पक्ष आणि राज ठाकरे याबाबत काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, सुनील शुक्ला यांना गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात त्यांच्या राजकीय ओळखीमुळे आणि उत्तर भारतीय हक्कांच्या वकिलीमुळे अनेक गंभीर धमक्या आणि छळ तसेच शारीरिक धमक्यांचा सामना करावा लागला आहे. या धमक्या आता सार्वजनिक हिंसाचार आणि शारीरिक हल्ल्यांपर्यंत वाढल्या आहेत, असा आरोप याचिकेमार्फत केला जात आहे.
याचिका दाखल केल्यानंतर सुनील शुक्ला यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, ‘‘राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदू्ंना मारायचा आदेश दिला आहे, असे वाटते. तुम्ही केवळ उत्तर भारतीयांच्या नव्हे तर मराठी लोकांच्याही विरोधात आहात. म्हणून मी तुमच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल केली आहे. तुम्ही संविधानाचे उल्लंघन करू शकत नाही. हिंदूंना तुम्ही मारू शकत नाही. आम्ही तुमचा विरोध करतो, निंदा करतो आणि सुप्रीम कोर्टातून तुमच्या विरुद्ध आदेश आणणारच,’’ असा आक्रमक पवित्रा सुनील शुक्ला यांनी घेतला आहे. यानंतर आता राज ठाकरे काय प्रत्युत्तर देणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे.