36.3 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?

ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सध्या सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी भावना सर्वच मराठी माणसांकडून व्यक्त केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत यासाठी आता मुंबईतील मराठी सेना अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. येत्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मुंबईतील मराठी सेना अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. येत्या ३० मार्च रोजी ठाकरे बंधू मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी मराठी सेना पक्षाने दादर सेना भवन परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर लावले होते. त्यानिमित्ताने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर निमंत्रण पत्रिका ठेवली आहे. ही निमंत्रण पत्रिका ठेवून बंधुत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. येत्या गुढीपाडव्याला हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले जाणार आहे.
निमंत्रण पत्रिकेत काय?
बंधू मिलन निमंत्रण, भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख-दु:खाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार. बंधू मिलन कार्यक्रम दिनांक ३० मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल, असे या निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. मोहनिश रवींद्र राऊळ यांनी ही निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर ठेवली आहे.

महाराष्ट्राला सध्या या दोघांची गरज
आज होळीचा सण आहे, त्यामुळे होळीला सर्व काही विसरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे. बंधू बंधूसाठी धावून येतो. महाराष्ट्राला सध्या या दोघांची गरज आहे. तसेच एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. मराठी माणूस मराठी माणसासोबत भांडतो. दोन गटांत विभाजन झाले आहे. दोन ठाकरे ब्रँड वेगळे झाले आहेत. जर ते एकत्र आले तर कुठेतरी मराठी माणसाला किंवा विविध कामगार सेनेला बळ मिळेल, अशी भावना मोहनिश रवींद्र राऊळ यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR