मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील राणीच्या बागेतील म्हणजे जिजामाता उद्यानातील वाघाचा मृत्यू झाला आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे याबाबत महापालिकेने कोणतीही माहिती समोर आणलेली नाही तर माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. सध्या राणीच्या बागेत म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘जय’ नावाचा वाघ आणि ‘करिश्मा’ नावाची वाघीण वास्तव्य करत आहेत.
व्याघ्रप्रेमी प्रथमेश जगताप यांना राणीच्या बागेतील शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचे कळले. या वाघाचा मृत्यू १७ नोव्हेंबरला झाला असून त्याची माहिती ८ दिवसांनी म्हणजेच २४ नोव्हेंबर रोजी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर वाघाचा मृत्यू जाहीर करण्यास ८ दिवस का लागले, असा सवाल आमदार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अजय चौधरी यांनी केला आहे. तसेच वाघाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार चौधरी यांनी केली आहे.

