नागपूर : प्रतिनिधी
भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या हलाल आणि झटका मटणावरील विधानामुळे राज्यात नवीन वाद सुरू झालाय. या वादावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणेंना जोरदार टोला लगावलाय. झटका आणि हलाल मटणावरून माथे फिरवणारे राणेंनी आधी ‘हलाल’मटणावर भरपूर ताव मारलाय, अशी कोपरखळी विजय वडेट्टीवार यांनी मारलीय. ते नागपूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
नितेश राणे यांचे जुने व्हिडिओ पाहा त्यात ते हलाल मटणावर ताव मारताना दिसतील,असे विजय वड्डेटीवार म्हणालेत. नितेश राणे संधीसाधू माणूस आहे. त्यांना योगी व्हायचंय की जोगी व्हायचे हे त्यांना माहितीये, परंतु त्यांच्या विधानामुळे प्रस्थापित नेत्यांना त्याचा तोटा होण्याची शक्यता असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणालेत. २०१७ मध्ये नितेश राणे हे काँग्रेसमध्ये होते. त्यावेळचे त्यांचे व्हिडिओ पाहा, त्यात ते हलाल केलेलं मटण दाबून खातांना दिसतील.
नितेश राणे काय नारायण राणेदेखील मटण खातांना दिसतील. रमजान महिन्याच्या ‘ईद मिलान’ समारोहामध्ये ते दोघेही मटण तोडताना दिसतील. मग याचा अर्थ काय समजायचा? तुम्ही समाजात विष पसरवण्याचं काम करत आहात. या देशात लोकशाही चालूच नाहीये. आपला देश आणि राज्य हे तालिबानीकडे झुकत असून देश तालिबानी होईल, असं काँग्रेस अध्यक्ष म्हणाले होते, असं वडेट्टीवार म्हणाले.
राज्यात काही ठिकाणी झालेल्या धार्मिक तेढविषयी बोलताना विजय वडेवट्टीवार म्हणाले, नेमकं कुठे धार्मिक वाद झालेत. कशामुळे झाले, याचा तपशील मी घेतोय. आता रमजान आणि होळीचा सण चालू आहे. ही हिंदूची-मुस्लिमांचे पवित्र सण आहेत. याआधी अशाप्रकारचे वातावरण नव्हते. आता कुठेही कशावरूनही वाद होतोय.
एकमेंकांमध्ये वाद लावण्याचे काम सरकारमधील मंत्री करत असतील तर सरकारलाच कायदा सुव्यवस्था खड्ड्यात घालायची आहे, असा याचा अर्थ निघतो, असा आरोप वडेट्टीवार केलाय.
मुघल शासक औरंगजेबच्या कबरीवरून चालू असलेल्या वादानंतर राज्यात आता झटका आणि हलाल मटणावरून आरोप-प्रत्यारोपाचे फैरी झडत आहेत.
राज्यात हिंदू मांस व्यापा-यांसाठी मल्हार सर्टिफिकेट दिलं जाईल, अशी घोषणा मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितीश राणे यांनी केली होती. ज्यांच्याकडे मल्हार प्रमाणपत्र आहे, त्या दुकानातूनच हिंदू समाजाच्या लोकांनी मांस खरेदी करावे, असं आवाहनही नितेश राणेंनी केले होते. त्यावरून राज्यात हलालविरुद्ध झटका मटण, असा वाद सुरू झालाय.
मल्हार सर्टिफिकेटला नाशिकमध्ये विरोध
नितेश राणे यांनी केलेल्या मल्हार सर्टिफिकेटला नाशिकमधील हिंदू खाटिक समाजाने विरोध केला. खाटिक समाजाला व्यवसायासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाहीये. शास्त्रीयदृष्ट्या खाण्यास अयोग्य असलेले झटका मटण हे महाराष्ट्रात कोणीही स्वीकारणार, असं खाटिक समाजाकडून सांगण्यात आलंय.