मुंबई : प्रतिनिधी
मल्हार सर्टिफिकेशनवरून जेजुरीकर विरुद्ध राणे संघर्ष पेटणार असल्याची चिन्हे आहेत. सरकारने नाव बदलावे अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा जेजुरीकरांनी दिली आहे. तर समर्थन दर्शवणा-या विश्वस्तांनाही गावबंदी करण्याचा इशारा असून मल्हार सर्टिफिकेशनवरून जेजुरीकरांचा संताप होत असल्याचे दिसून येत आहे.
मटण दुकानांना दिल्या जाणा-या मल्हार सर्टिफिकेशनवरून जेजुरीकर संतप्त झाले आहेत. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या जेजुरीत खांदेकरी, मानकरी, पुजारी आणि जेजुरी ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत मल्हार या नावाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. या बैठकीत मल्हार नावाला समर्थन दर्शवणा-या विश्वस्तांचाही निषेध नोंदविण्यात आला. सरकारने ‘मल्हार सर्टिफिकेशन’ नाव बदलण्यासाठी जेजुरीकर आग्रही असून मल्हार नाव बदला अन्यथा आमरण उपोषण आणि मल्हार नावाला समर्थन दर्शवणा-या विश्वस्तांनाही गाव बंदीचा इशारा देण्यात आला आहे.
जेजुरीचा खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. आणि मल्हार म्हणजेच खंडोबा होय. त्यामुळे मल्हार नावाला कडाडून विरोध होतोय. दरम्यान राणे यांनी केलेल्या या घोषणेमुळे मोठा वाद उफाळून आला आहे.
हिंदू देव-देवतांची नावे देणे योग्य नाही
जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लाखोंनी भाविक जेजुरीत येतात. अवघ्या महाराष्ट्राचे हे कुलदैवत आहे. त्यामुळे अशा सरकारी योजनांना हिंदू देवतांची नावे देणे योग्य नाही, म्हणत सर्वप्रथम श्री मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी याला विरोध दर्शवला. खेडेकरांच्या या विरोधानंतर हा लढा अधिकच तीव्र होताना दिसतोय. मल्हार सर्टिफिकेशनला विरोध दर्शवण्यासाठी जेजुरीकर पेटून उठले असून जेजुरीकरांच्या या लढ्यात ब्राह्मण समाजानेही पाठिंबा दर्शवला आहे.
सरकारला पत्र लिहिणार
तर मल्हार हलालशी संलग्न होऊ नये. याचा परिणाम फार वाईट होणार आहे, असे येथील पुजा-यांचे म्हणणे आहे. वेळ पडली तर आमरण उपोषण करून पण राणेंना त्यांची जागा दाखवू असा इशाराच जेजुरीकरांनी दिला आहे. आता जेजुरीकर आणि खांदेकरी, मानकरी, पुजारी हे मंत्री नितेश राणेंसह सरकारला एक पत्र लिहिणार आहेत. या पत्राद्वारे मल्हार हे नाव तात्काळ बदलण्याची मागणी केली जाणार आहे.