निलंगा : प्रतिनिधी
दिवाळखोरीत निघालेल्या रामजानकी फायनान्सच्या संचालक मंडळ व ठेवीदाराच्या त्रासाला कंटाळून फायनान्सचे संचालक संतोष बाबुराव सुरवसे यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने निलंगा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त कले म्हणून सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २०१५ मध्ये स्थापन झालेल्या रामजानकी फायनान्स एक वर्षाखाली आर्थिक व्यवहारातून दिवाळखोरीस निघत फायनान्सला कुलूप लागले. फायनान्सचे संचालक व मॅनेजर असलेले संतोष बाबुराव सुरवसे वय ५० यांच्यामुळेच फायनान्स बुडीत निघाले असा आरोप संतोष सुरवसे यांच्यावर ठेवण्यात आला. फायनान्सचे ठेवीदार संतोष सुरवसे यांच्याकडे पैशाचा तगादा लागल्याने व संचालक मंडळातील इतर सहा सदस्यांनी तुझ्यामुळेच फायनान्स तोट्यात गेले तूच पैसे परत कर अशी धमकी दिल्याने त्रासाला कंटाळून संतोष सुरवसे हे दि ११ रोजी पहाटे घरातून निघून गेले. याची फिर्याद देण्यासाठी त्यांची पत्नी व मुलांनी मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता मिसिंग तक्रार २४ तासानंतर दाखल करता येते म्हणून त्यांना पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
मंगळवारी दिवसभर त्यांनी शोध घेतला असता कोठेच पत्ता लागला नाही. दि १२ बुधवारी रोजी दापका वेशीमधील विहीरीत संतोषचा मृतदेह तरंगताना आढळून आला. तात्काळ नातेवाईकांनी प्रेत बाहेर काढून निलंगा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केली. रामजानकी फायनान्सच्या संचालक मंडळाच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केल्याची फिर्याद मयताच्या पत्नीने केल्याने फिर्यादीवरून निलंगा पोलीस ठाण्यात सहा जणाविरुद्ध कलम १०८, ३५१ (२) (३) ३ (५ ) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे हे करीत आहेत.