लातूर : प्रतिनिधी
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म दि. ३० जुलै रोजी उदगीरला येणार असून त्यांच्या हस्ते बुद्धविहारासह विविध कार्यक्रमांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे बोलत होते. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घूगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, डॉ. उपगुप्त महाथेरो, नागसेन बोधी, भन्ते पंय्यानंद थेरो, बौद्धाचार्य केशव कांबळे यांची उपस्थिती होती. दि. ३० जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नांदेड येथून हेलिकॉपटरने उदगीरला येणार आहेत. उदगीरच्या तळवेस येथे उभारण्यात आलेल्या बुद्धविहारचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर उदयगीरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह स्थानिक खासदार, सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौ-याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सुक्ष्म नियोजन, सुरक्षेचाही आढावा घेण्यात आल्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगीतले.