15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील भाजप नेत्याच्या भेटीला

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील भाजप नेत्याच्या भेटीला

बंद दाराआड तासभर चर्चा, चर्चेला उधाण

सातारा : प्रतिनिधी
साता-यातील एका बड्या भाजपा नेत्याच्या घरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रविवारी सकाळी साता-यातील भाजपा नेते मदन भोसले यांच्या घरी जयंत पाटलांनी भेट दिली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने शिल्लक आहेत त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला धक्का देण्याची खेळी शरद पवार खेळत आहेत. त्यात कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील समरजितसिंह घाटगे यांना पक्षात आणून पवारांनी भाजपाला दे धक्का दिला आहे. अशातच जयंत पाटील यांनी बंद दाराआड मदन भोसले यांच्याशी चर्चा केली. यात मदन भोसलेंना शरद पवारांसोबत येण्याचा प्रस्ताव दिल्याचे बोलले जाते. मदन भोसले यांचे वाई तालुक्यात वर्चस्व आहे. वाईमधील विद्यमान आमदार मकरंद पाटील हे अजित पवारांसोबत गेलेत. महायुतीत ही जागा त्यांना सोडली जाऊ शकते. त्यामुळेच मदन भोसले आणि जयंत पाटील यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मदन भोसले यांच्या भेटीनंतर जयंत पाटील हे त्यांच्या घरातून हसतहसत बाहेर पडले. मात्र भेटीत काय चर्चा झाली याबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला. भाजपामधील सर्वजण माझे मित्र आहेत असे सांगत त्यांनी इतर तपशील बोलण्याचा टाळला. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट विविध रणनीती आखत आहे. त्याचाच भाग म्हणून पक्ष सोडून गेलेले आमदार आणि त्यांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्वाचा विचार यातूनच नाराज नेत्यांना पक्षात घेण्याचा चंग पवारांनी बांधला आहे.

कोल्हापुरातील समरजितसिंह घाटगे यांच्या निमित्ताने पहिला मोहरा शरद पवारांच्या गळाला लागला. आता त्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी भेटीगाठी, मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. त्यात भाजपातील नाराज हर्षवर्धन पाटील हेदेखील शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढतील अशी चर्चा सुरू आहे. इंदापुरात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत गेल्याने याठिकाणी महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सोडली जाईल अशी शक्यता असल्याने भाजपा नेते हर्षवर्धन पाटीलही नाराज आहेत. त्यात आता वाई मतदारसंघात भाजपा नेते मदन भोसले हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR