सांगली : शरद पवार राष्ट्रवादीने आता नवीन पायंडा पाडला आहे. मोबाईलवर बोलताना ‘हॅलो’ ऐवजी ‘जय शिवराय’ म्हणायचं असा नवीन संकल्प घेण्यात आला आहे. सांगली येथील पक्षाच्या मेळाव्यातून हा संदेश देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील फुटीच्या चर्चेला विराम देतानाच नवीन संकल्प सोडण्यात आला. आता राष्ट्रवादीतील कार्यकर्ते मोबाईलवर बोलताना ‘हॅलो’ ऐवजी ‘जय शिवराय’ म्हणतील. याविषयीचा निर्धार सांगली येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
इतकेच नाही तर त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झाली. आता शरद पवार गटातील कार्यकर्ते सकाळपासूनच एकमेकांना फोनवर बोलताना ‘जय शिवराय’ करत आहेत. सांगली येथील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी आता फोनवर ‘हॅलो’ऐवजी ‘जय शिवराय’ असे म्हणायचा आदेश दिला. यापुढे ज्यावेळी आपण एकमेकांशी संवाद साधू त्यावेळी फोनवर लागलीच ‘जय शिवराय’ म्हणायचे असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे सांगलीतून लागलीच या नवीन संकल्पाची सुरुवात सुद्धा झाली. हा एक चांगला पायंडा राष्ट्रवादीने पाडला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत राष्ट्रवादीचा मेळावा झाला. त्यावेळी शिंदे यांनी कोणताही फोन आला तरी आता ‘हॅलो’ऐवजी ‘जय शिवराय’ म्हणायचं असा निर्धार सांगितला.