महायुतीचे गिफ्ट, अण्णा बनसोडे यांची वर्णी लागणार?
मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेत विक्रमी बहुमत घेत महायुती सरकारने राज्यात सत्ता स्थापन केली. यात भाजप सर्वाधिक जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष ठरला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. विधानसभेत भाजपचे मोठे संख्याबळ असल्याने भाजप नेते राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. मात्र, विधानसभा उपाध्यक्षपद अद्याप रिक्त आहे. आता या पदाची लॉटरी राष्ट्रवादी अजित पवार गटाला लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे असून, आ. अण्णा बनसोडे यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छगन भुजबळ यांच्या म्हणण्याप्रमाणे निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त आहे. याचेच बक्षीस म्हणून की काय भाजप आता राष्ट्रवादीला विधानसभा उपाध्यक्षपद देणार आहे. विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या कार्यकाळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांनी विधानसभा उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर आताचे राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता पक्षाला भाजपकडून उपाध्यक्षपदाचा मान पुन्हा राष्ट्रवादीलाच देणार असल्याचे समजते. विधीमंडळ कामकाजाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेचे उपाध्यक्ष पदावर निर्णय होणार असल्याची माहिती आहे.