परभणी : भाजप सरकारने राज्यातील शिक्षणाची वाट लावली आहे. सरकारने दोन वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी निगडित घेतलेले असंख्य निर्णय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवत आहेत. हे सरकार बदलल्या शिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी संपणार नाहीत असे आवाहन करत आज जिल्हयातील, शहारातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आर.आर. पेट्रोल पंप येथे एकत्र येत घंटानाद आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न टोंग पाटील यांनी सांगितले की, कमी पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील १४ हजाराहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा डाव भाजप सरकारने आखला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय नुकताच भाजप सरकारने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत साधा गणवेश या सरकारला देता आला नाही. राज्यातील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात कायमस्वरूपी शिक्षक या सरकारला नेमता आलेले नाहीत.
या शिक्षकांना देखील गेल्या दीड दोन वर्षांपासून पगार दिलेला नाही. यावर्षी या तंत्रनिकेतन महाविद्यालयात अजून पर्यंत शिक्षकच नेमलेले नाहीत. राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणा-या असंख्य कंपन्या गुजरात व इतर राज्यात गेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याने राज्यातील मुले डॉक्टर होण्यापासून वंचित राहिली आहेत.
अशा प्रकारच्या विविध निर्णयामुळे राज्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड होऊन बसले आहे. हे सरकार बदलले नाही तर राज्यातील विद्यार्थी देशोधडीला लागतील. त्यामुळे शिक्षण वाचवण्यासाठी हे सरकार बदलणे आवश्यक आहे. यावेळी आंदोलनात प्रद्युम्न टोंग पाटील, दर्शन देशमुख, गोविंद कदम, वैभव पवार व विद्यार्थी उपस्थित होते.