परभणी : बेंगळुरू येथे दि. २४ ते २७ सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या राष्ट्रीय ट्रॅम्पोलिन अँड टम्बलिंग जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत परभणीचा खेळाडू आदित्य खळीकर याने सिनीयर गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. गेल्या ४ वर्षातील सलग राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आदित्यने सलग चौथ्यांदा सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. बेंगळुरू येथील कामगिरीच्या बळावर आदित्यची चिन मध्ये आयोजित करण्यात येणा-या आंतरराष्ट्रीय ट्रॅम्पोलिन अँड टम्बलिंग जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी निवड झाली असून या यशाने परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
बेंगळुरू येथील स्पर्धेत सीनियर गटात आदित्य खळीकरने लक्षवेधी काम करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यापुर्वी त्याने केरळ येथील स्पर्धेत सब ज्युनियर, सुरत व डेहराडून येथे ज्युनियर तर बेंगळुरू येथील स्पर्धेत सिनीयर गटात सर्वोत्कृष्ट काम करत सलग ४थ्या वेळेस सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. बेंगळुरू येथील चित्तथरारक कामगिरीच्या आधारे आदित्यची चिन मध्ये आयोजित करण्यात येणा-या आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्याच्यावर जिम्नॅस्टीक खेळातील मान्यवरांसह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून संदीप लटपटे यांनी काम पाहिले. राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून प्रदीप लटपटे व वैभव खुणे यांनी जबाबदारी सांभाळली. आदित्य खळीकरच्या सुवर्ण यशात प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व अचूक प्रशिक्षणाचे योगदान महत्वपूर्ण ठरले. या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव लटपटे, जिल्हा संघटनेच्या सचिव ज्ञानेश्वरी लटपटे यांनी आनंद व्यक्त करून आदित्य खळीकरचे अभिनंदन केले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत प्रत्यक्ष उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देणा-या मनीषा केंद्रे यांनी देखील खेळाडूंच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. या यशाबद्दल खळीकर कुटुंबियांसह नातेवाईक, मित्र परीवार व सर्व स्तरातून आदित्यवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
















