सातारा : राज्यात समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरमहिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. स्वच्छतागृह बांधल्यानंतर त्याची स्वच्छता व देखभाल झाली पाहिजे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.
साता-यातील शासकीय विश्रामगृह येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व उपअभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रस्ते, सर्व प्रकारचे पूल बांधणे, पथदिवे बसवणे, हॅम, नाबार्ड व इतर योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी आढावा घेतला. बामणोली ते दरे व तापोळा ते अहिर केबल स्टे पूल, आपटी ते तापोळा मोठा पूल बांधणे, सातारा-कोरेगाव रस्त्यावरील माहुली येथील नवीन पूल बांधणे, जिल्हा रुग्णालयातील कर्मचा-यांसाठी निवासस्थान बांधणे, सैनिक स्कूल नूतनीकरण, पाटण शासकीय इमारत, वाई शासकीय इमारत बांधकाम आदी सर्व कामांच्या प्रगतीबाबत चर्चा झाली.