नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने शुक्रवारी ३९ जणांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून यात राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश आहे. राहुल गांधी हे पुन्हा एकदा केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. तसेच शशी थरुर थिरुवनंतपुरम, माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल राजनांदगाव मतदारसंघातून लढणार आहेत. पहिल्या यादीत कॉंग्रसचे १५ उमेदवार खुल्या प्रवर्गातील, तर २४ उमेदवार एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तारीख पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली. राहुल गांधींसह पहिल्या यादीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नावाचा समावेश आहे. ते राजनांदगावमधून निवडणूक लढवणार आहेत. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही यादी जाहीर केली.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत १५ जण खुल्या वर्गातील आहेत, तर २४ उमेदवार एससी, एसटी आणि ओबीसी आणि अल्पसंख्यांक वर्गातील आहेत. गेल्याच आठवड्यात भाजपने १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. ज्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. आता काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतदेखील महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. काँग्रेसने केरळमधील सर्वाधिक म्हणजेच १५ उमेदवार जाहीर केले आहेत.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत १२ उमेदवार असे आहेत, ज्यांचे वय ५० पेक्षा कमी आहे. ८ उमेदवारांचे वय ५० ते ६० वर्षांदरम्यान आहे. १२ उमेदवारांचे वय ६१ ते ७० दरम्यान तर ७ उमेदवारांचे वय ७१ ते ७६ दरम्यान आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक गुरुवारी झाली होती. या बैठकीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, सचिन पायलट आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रेत असल्याने ते या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.
पहिल्या यादीतील
महत्त्वाचे उमेदवार
राहुल गांधी- वायनाड
शिवकुमार दहिया- जांजगीर चांपा
भूपेश बघेल- राजनांदगाव
शशी थरूर- तिरुवनंतपूरम
डीके सुरेश- बंगळुरू ग्रामीण
राज्य-उमेदवारांची संख्या
छत्तीसगड- ०६
कर्नाटक- ०७
केरळ- १६
तेलंगणा-०४
त्रिपुरा- ०१
सिक्कीम- ०१
नागालँड- ०१
मेघालय-०१
लक्षद्वीप- ०१