लातूर : प्रतिनिधी
काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांनी सातत्याने जातीनिहाय जनगणनेची मागणी केली. विविध सभा, संसदेतसुद्धा राहूल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरला. त्यामुळेच केंद्र सरकारला जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाचे रेखाचित्रकार राहूल गांधी असल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसच्या वतीने येत्या जुन महिन्यात ओबीसी काँग्रेसचा मराठवाड्याचा मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेस भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेतस मराठवाडा ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कांचनकुमार चाटे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, ओबीसी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष प्राचार्य एकनाथ पाटील, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, माजी महापौर अॅड. दीपक सुळ, विजयकुमार साबदे, धायगुडे, प्रा. प्रविण कांबळे, प्रविण सूर्यवंशी, कैलास कांबळे, सिकंदर पटेल, आसिफ बागवान यांची उपस्थिती होती.
केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला परंतूू, ही जनगणना कोणत्या एजन्सीमार्फत करणार याची स्पष्टता नाही. जातीनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला २६ ते ३० हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्याची अर्थसंकल्पात तरतुद केली नाही. सर्व जातींची जनगणना होणार पण कोणताही फार्मुला जाहीर केला नाही. या तीन मुद्दांची उत्तरे अद्यापही सरकारने दिली नाहीत. त्यामुळे सरकारचा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय निवडणुकाचे षडयंत्र तर नव्हे, अशी शंका येते.
केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला. त्याचे खरे श्रेय हे काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना जाते. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनूसार ओबीसी काँग्रेसचा मराठवाड्याचा मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या जुन महिन्यात घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात एक लाखांपेक्षा अधिक ओबीसी बांधव सहभागी होतील, असेही भानुदास माळी यांनी सांगीतले.