नागपूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी परभणीच्या दौ-यावर येत असून ते पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुण कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली.
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर घडलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज परभणीत जाऊन सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली. आता राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेणार आहेत.
राहुल गांधी हे २३ नोव्हेंबर रोजी विशेष विमानाने दुपारी एक वाजता नांदेड विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते वाहनाने परभणीत पोहचतील. साधारणत: दुपारी पावणेतीन ते साडेतीन या दरम्यान ते सूर्यवंशी कुटुंबाची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा दिल्लीला रवाना होतील. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.