मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रोटेम स्पीकर कालिदास कोळंबकर यांनी हा निर्णय घेतला. अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी एकट्याने अर्ज दाखल केला होता, त्यानंतर अन्य कोणीही उमेदवारी दाखल केली नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.
दरम्यान विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. यानंतर यावर सभागृहाने एकमताने नार्वेकर यांच्या निवडीला संमती देण्यात आली. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नार्वेकर यांचे स्वागत केले.
राहुल नार्वेकर यांना मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षाच्या आसनाजवळ सन्मानानं नेलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नार्वेकर यांच्या आसनाजवळ जात अभिनंदन केले. राहुल नार्वेकर यांनी गेल्या पंचवार्षिकला शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीवर निकाल दिल्याने ते सर्वाधिक चर्चेत आहेत.
सुमारे अडीच वर्षे १४ व्या विधानसभेचे अध्यक्ष असलेले भाजप नेते नार्वेकर २० नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून आले आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर नव्या सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यानंतर राज्यपाल सीपी राधाकृष्णन राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाच्या त्यांच्या मागील कार्यकाळात शिवसेना आणि राष्ट्रवादीत पक्षात फूट पडल्यानंतर नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष ‘खरी शिवसेना’ असल्याचा निर्णय दिला होता. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ज्याची स्थापना शरद पवारांनी केली होती, असा निर्णयही त्यांनी दिला होता.