मुंबई : प्रतिनिधी
पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण प्रशासनावर रोषाचा डोंगर कोसळला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत धोत्रे (६१) असे व्यक्तीचे नाव आहे. चंद्रकांत धोत्रे यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ७ एप्रिलच्या मध्यरात्री घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत धोत्रे हे कोर्टाच्या कामासाठी मुंबईत आले होते. ते मतदारसंघातील असल्यामुळे आमदार विजय देशमुख यांच्या खोली क्रमांक ४०८ मध्ये ते थांबले होते. दरम्यान ७ एप्रिलच्या मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या सोबत असणा-या लोकांनी रुग्णवाहिकेला फोन केला, पण ती वेळेत उपलब्ध झाली नाही.
परिणामी आमदार निवासनजीक असणा-या पोलिसांच्या २ नंबरच्या गाडीतून चंद्रकांत धोत्रे यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.