मुंबई : प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय अर्थव्यवस्थेवर संकट आल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात होत असलेली पडझड आणि दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण यामुळे सध्या भारतीय अर्थव्यवस्थेवर संकट ओढवले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर महागाई कमी होईल, अशी आस लावून बसलेल्या सामान्य लोकांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याने महागाई वाढली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसू लागली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे विदेशातून आयात करण्यात येणा-या वस्तूंसाठी आता ज्यादा किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे आयात वस्तूंचे दर आपोआप वाढत आहेत. यासाठी आता ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे भारतीयांना महागाईच्या झळा सोसण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी जानेवारी २०२४ मध्ये एका डॉलरसाठी ८३ रुपये मोजावे लागत होते. आता जवळपास ८७ रुपये मोजावे लागत आहेत. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे.
या घसरणीचा परिणाम म्हणजे भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेत मूल्य कमी झाले. एका अमेरिकन डॉलरसाठी भारतात ८७ रुपये द्यावे लागतात. या रुपयाच्या घसरणीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येत आहे. याचबरोबर दैनंदिन वस्तूसुद्धा महाग होत असून, दैनंदिन जीवनावर याचा परिणाम दिसून येत आहे. विशेष म्हणजे या घसरणीमुळे परदेशातून आयात होणा-या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल, इंधन, कच्चे तेल तसेच अन्य ज्या वस्तूंची विदेशातून आयात केली जाते, त्या वस्तू महाग होत आहेत. याची झळा सर्वसामान्यांना सोसाव्या लागणार आहेत.
सध्या देशात पेट्रोल, डिझेल आणि अन्य इंधन विदेशातून आयात केले जाते. यासाठी डॉलर हे चलन देऊन इंधन विकत घेतले जाते. रशिया किंवा अन्य आखाती देशांकडून इंधनाचा पुरवठा केला जातो. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल यांचा पुन्हा एकदा भडका उडू शकतो. देशात सध्या शेअर बाजारातील निर्देशांक दिवसेंदिवस घसरत आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. ही सर्व परिस्थिती पाहिली तर लोकसभा निवडणुकीनंतर महागाई कमी होईल आणि सामान्यांना दिलासा मिळेल, अशी आशा लोकांना होती. मात्र त्याच्या विपरीत परिस्थिती उद्भवली असल्याने सध्या भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठे संकट आले आहे. या परिस्थितीतून बाहेर पडणे हे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान आहे, असे अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी म्हटले आहे.
या वस्तू महागणार
– इंधन
– मोबाईल आणि लॅपटॉप
– कडधान्य आणि डाळी
– इलेक्ट्रॉनिक उपकरणे