सोलापूर-रेल्वे रुळाचे निरीक्षण करताना (गाडी क्र. २२८८१) पुणे-भुवनेश्वर साप्ताहिक धडकेत रेल्वे एक्स्प्रेसच्या इंजिनीअरचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूरजवळील बाळे स्टेशनजवळ घडली. श्रीमंत सोमण्णा पुजारी (वय ५०, रा. बोरोटी) असे या अपघातात मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीमंत पुजारी हे बाळे येथे रेल्वे रुळाचे निरीक्षण करीत होते. त्यांना गाडी आलेला अंदाज न आल्याने जोरदार धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुजारी हे बोरोटी येथे गँगमन म्हणून काम करीत होते.
पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना पदोन्नती मिळाल्याने सोलापूर विभागीय कार्यालयात ज्युनिअर इंजिनीअरिंग विभागात इंजिनीअर म्हणून पदभार घेतला होता. पुजारी हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथील रहिवासी आहेत. या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांच्या नातेवाइकांची गर्दी झाली होती.