भाजपचे धक्कातंत्र, आज रामलिला मैदानावर शपथविधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अखेर ११ दिवसांनी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे दिल्लीतही भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीत २७ वर्षांनी भाजपने सत्ता मिळविली. त्यानंतर भाजपने दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा एका महिलेकडे सोपवून नवा पॅटर्न तयार केला.
रामलीला मैदानावर रेखा गुप्ता उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. रेखा गुप्ता शालिमार बाग मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क, संघटनात्मक कौशल्य या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. सध्याच्या घडीला भाजपची २१ राज्यांमध्ये सत्ता आहे. पण या राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री नाही. त्यामुळे दिल्लीत भाजपने पॅटर्न बदलला आहे. मूळच्या हरियाणातील जिंदच्या रेखा गुप्ता विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. मेरठमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी त्यांचे जुने नाते आहे. त्या उत्तर दिल्लीच्या महापौर राहिल्या आहेत. त्यामुळे प्रशासन चालवण्याचा अनुभव त्यांना आहे. भाजप महिला मोर्चाच्या त्या प्रभावशाली नेत्या आहेत. सध्याच्या घडीला त्या दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या महासचिव आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्य आहेत.
रेखा गुप्ता यांनी यंदाच्या निवडणुकीत शालिमार बाग मतदारसंघातून २९ हजार ५९५ मतांनी विजय मिळवला. त्यांना ६८ हजार २०० मते मिळाली. आम आदमी पक्षाच्या बंदना कुमारी यांचा पराभव करत रेखा गुप्ता आमदार झाल्या. या मतदारसंघात काँग्रेसचे प्रवीणकुमार जैन तिस-या क्रमांकावर राहिले. २०२० आणि २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकांत आपच्या बंदना कुमारी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी रेखा गुप्ता यांचाच पराभव केला होता.
प्रवेश वर्माचे नाव होते चर्चेत
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. त्यात आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना पराभूत केलेले पर्वेश वर्मा यांचे नाव आघाडीवर होते. पण भाजपने यावेळी एका महिला आमदाराला मुख्यमंत्रीपदासाठी संधी दिली. नेहमीप्रमाणे आपल्या धक्कातंत्राचा अवलंब करत रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. त्यामुळे पर्वेश यांच्यासाठी हा धक्का आहे. पर्वेश वर्मादेखील माजी मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मा यांचे पुत्र आहेत.
नगरसेवक ते मुख्यमंत्री
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा केली. एक नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास राहिला आहे. रेखा गुप्ता ह्या संघविचारक राहिल्या असून विद्यार्थी संघटनेपासून त्या भाजपमध्ये कार्यरत आहेत. १९९५-९६ मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या सचिव राहिल्या. त्यानंतर अध्यक्ष बनल्या. दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव, युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव आणि २००७ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश करीत उत्तरी पीतमपुरा वार्डातून नगरसेवक बनल्या. त्यानंतर आता पहिल्यांदाच आमदार बनल्या आणि मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ््यात पडली.