रेणापूर : प्रतिनिधी
नगर पंचायत निवडणुकीत भ्रष्टाचा-यांना दूर करुन मतदारांनी नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, धिरज विलासराव देशमुख यांनी केले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माने अर्चना प्रदीप, वॉर्ड क्रमांक १ मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रदीप सुधाकर काळे, वॉर्ड क्रमांक २ च्या उमेदवार कांताबाई हिरामन राठोड, वॉर्ड क्रमांक ३ चे उमेदवार आकनगिरे पुजा प्रशांत, वॉर्ड क्रमांक ४ चे उमेदवार अजयकुमार भिवा चक्रे, वॉर्ड क्रमांक ५ चे उमेदवार गोविंद प्रभू भोकरे, वॉर्ड क्रमांक ६ च्या उमेदवार शितल अतुल कातळे, वॉर्ड क्रमांक ७ चे सचिन अनुरथ मोटेगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
माजी आमदार धिरज देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात रेणापूर नगरपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता मात्र, सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी हा निधी रेणापूरच्या विकासकामांवर खर्च करण्याऐवजी स्वत:च्या खिशात घातला. भाजपच्या याच भ्रष्टाचारी कारभारामुळे जनतेची कामे झाली नाहीत आणि जनतेला वेठीस धरण्याचे काम भाजपने केले, कॉंग्रेसची सत्ता आल्यास या भ्रष्ट लोकांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले. या प्रचारात कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला असून ठिकठिकाणी मतदार त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे.
याउलट भाजपा नेत्यांना व उमेदवारांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून रेणापूरच्या विकासासाठी काय केले, असा जाब विचारला जात आहे. मतदारांच्या या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांची चांगलीच पंचाईत होते आहे.
एकूणच रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून सत्ताधारी भाजपावरील रोष पाहता काँग्रेस मोठ्या मताधिक्याच्या फरकाने विजयी होईल, असा हा विश्वास काँग्रेस नेत्यांसह मतदारांमधून व्यक्त केला जात आहे. प्रचार बैठकीस उमेदवार, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

