नालासोपारा : प्रतिनिधी
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. नालासोपारा रेल्वे स्टेशनवरील टीसी रितेश मोर्या याने एका मराठी प्रवाशाला धमकावून त्याच्याकडून यापुढे मी मराठीची मागणी करणार नाही असे लिहून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अमित पाटील असे मराठी व्यक्तीचे नाव असून या प्रकाराची दखल मराठी एकीकरण समितीने घेत रेल्वे प्रशासनाला जाब विचारला आहे. याबाबत मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख यांच्यासह पदाधिका-यांनी नालासोपारा रेल्वे स्टेशनला भेट दिली. त्याठिकाणी रेल्वे प्रशासनाला जाब विचारला. ते म्हणाले की, रितेश मोर्या या तिकिट तपासनीसला निलंबित करावे. मराठी भाषा हा आमच्या अस्मितेचा विषय असून आमच्या मराठी माणसांचा त्याने अपमान केलेला आहे.
महाराष्ट्रात मराठी माणसाने मराठी बोलायचे नाही असे या मुजोर टीसीने लिहून घेतले. एकनाथ शिंदे निवडणुकीच्या प्रचारात आहेत. मराठी बोलण्याची मागणी करणा-या अमित पाटील यांच्याकडून मराठी भाषेची मागणी करणार नाही असे लिहून घेतले. संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी लढा दिला. परप्रांतातून आलेला हा टीसी, आमचे रोजगार हिरावून घेतले, सगळे अधिकारी, कर्मचारी रेल्वेत परप्रांतीय भरले जातात याची लाज प्रशासनाला वाटली पाहिजे असे त्यांनी म्हटले.