पुणे/मुंबई : प्रतिनिधी
शेतीचा हंगाम संपल्याने आता शेतमजुरांच्या हाताला कामाची गरज आहे. मात्र, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याने मजुरांना रोजगाराच्या शोधार्थ आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात स्थलांतर करावे लागत आहे.
दरम्यान, शेती हंगाम संपल्यावर मजुरांच्या हाताला काम नाही. तालुक्यात रोजगाराचे दुसरे साधन नाही. त्यामुळे मजूर रोजगारासाठी परराज्यांत जाणे पसंत करीत आहेत. लगतच्या आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, त्या प्रमाणात तिथे मजूर मिळत नाहीत, महाराष्ट्रातील मजूर मोठ्या प्रमाणावर मिरची तोडण्यासाठी स्थलांतरित होत आहेत. तीन-चार महिन्यांसाठी हे मजूर परराज्यांत स्थलांतरित होतात.
राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बहुतांश अधिकारी व्यस्त होते. परिणामी, रोजगार हमी योजनेच्या कामांच्या प्रशासकीय मान्यतेला विलंब झाला. कामांचा कार्यारंभ आदेश जारी झाला नाही. रोजगार हमी योजनेची कामे तालुक्यात सध्या कुठेही सुरू नाहीत.
दरम्यान, मनरेगाबद्दल काही जाचक अटी लावल्या आहेत.
केंद्र सरकारने देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर काम करणा-या मजुरांची उपस्थिती नोंदविण्यासाठी १ जानेवारी २०२४ पासून ग्रामरोजगार सेवकामार्फत मोबाईलद्वारे एनएमएमएस या प्रणालीचा वापर करून दिवसातून दोन वेळा (सकाळी ६ ते ११ या वेळात व दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत) फोटो घेणे बंधनकारक केले आहे.
परंतु ग्रामीण भागात इंटरनेटचा अभाव, एनएमएमएस प्रणाली वापरताना येत असलेल्या अडचणी यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी रोजगार हमी योजनेतील कामे ठप्प झाल्याचे चित्र आहे यामध्ये कामावर आल्यावर मजुराचा दोन सत्रांतील फोटो अपलोड केला तरच त्याला मजुरी मिळणार आहे.
फोटो अपलोड झाला नाही तर काम करूनही गैरहजरी लागणार आहे. काही वेळेस मजूर दुपारच्या सत्रात कामाला येतात पण सकाळी मजूर नसल्याने सकाळी फोटो घेतला जात नाही. मोबाईल अॅपवर मजुराचा फोटो दिवसातून दोन वेळा आला असेल तरच त्या मजुराला दिवसाची मजुरी मिळणार आहे, अशी जाचक अट या आदेशात असल्यामुळे राज्यभरात वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत सुरू असलेली रोजगार हमी योजनेची सर्व कामे आता बंद पडली आहेत. ही कामे बंद पडल्यामुळे मजुरांची उपासमार सुरू झाली आहे.
सरकारच्या धोरणामुळे बेरोजगारीचे संकट
कामेच सुरू झाली नसल्याने गावातील मजूर कामाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारच्या धोरणामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले. रोजगार हमी योजनेच्या कामांनी मजुरांना मोठा आधार मिळतो. यामुळे गावात राहून रोजगार उपलब्ध होत असल्याने मजूरही समाधान व्यक्त करतात. असे असताना कामे सुरूच झाली नसल्याने मजुरांवर बेरोजगारीचे सावट कायम आहे.