अहमदपूर : प्रतिनिधी
रोटरी क्लबच्या वतीने दिला गेलेला रोटरी भूषण पुरस्कार हा मला कायम स्मरणात राहणारा असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे केले. अहमदपूर येथील किलबिल इंटरनॅशनल स्कूल येथे रोटरी क्लब अहमदपूर यांच्या वतीने राज्याचे सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांना रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष कपिल बिराजदार हे होते. मंचावर सचिव प्रदीप ढेले,
उपप्रांतपाल चंद्रशेखर मुळे, इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ज्ञानोबा भोसले, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सहकारमंत्री पाटील म्हणाले की, रोटरी क्लबचे माझे जुने नाते असून रोटरी क्लब हे समाजातील चांगल्या गोष्टी स्वीकारतात. रोटरी क्लबचे काम अत्यंत मोठे असून, रोटरी क्लबचा हा दिला जाणारा पुरस्कार हा आपल्या माणसांचा पुरस्कार आहे. त्यामुळे मला तो अधिक हृदयस्पर्शी वाटतोे. यावेळी अहमदपूर तालुक्यातील जवळपास २२ जणांना राष्ट्र शिल्पकार पुरस्काराने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष कपिल बिराजदार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल चवळे यांनी केले.