चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील रोहिणा येथील साठवण तलावातून अवैध पाणी उपसा करणारे १६ विद्युत पंप मृद व जलसंधारण उपविभाग अहमदपूर यांच्या पथकाने गुरुवारी दि १७ रोजी बाहेर काढले. दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता महावितरणकडून तलावाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. १ हजार ८६ घनमीटर क्षमता असलेल्या साठवण तलावात सद्यस्थितीत केवळ ३० टक्के इतकाच पाणी साठा उपलब्ध असून एक दिवस आधी रोहिणा गावात दवंडी देऊन गावक-यांना सूचना दिल्यामुळे आणि विद्युत पंप जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्यामुळे शेतक-यांनी आपापले विद्युत पंप काढून घेतले.
आगामी काळात पाऊस झाला आणि पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईपर्यंत पाणी उपसा टाळण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या. या पथकात जे. बी पटेल उप अभियंता मृद व जलसंधारण उप विभाग अहमदपूर ,कनिष्ठ अभियंता ए. एस. बनसोडे, एस. बी. जाधव, ग्राम महसूल अधिकारी गौतम सोनटक्के, ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानोबा सुतार, पोलिस कर्मचारी योगेश मरपल्ले, पोलिस पाटील फुलचंद केंद्रे, महावितरणाचे लाईनमन खडके, सहाय्यक कपिल एकलिंगे, ग्रामपंचायत कर्मचारी अहमद शेख, देविदास कांबळेसह माधव मळभागे यांचा समावेश होता.
















