मुंबई : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून सातत्याने महिलांवरील अत्याचारांत वाढ होताना पाहायला मिळत आहे. या वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ‘सह्याद्री’ अतिथीगृहाबाहेर आंदोलन केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक महिला कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
दरम्यान,मुंबईतील ‘सह्याद्री’ अतिथीगृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिलांनी आंदोलन केले. या आंदोलनावेळी महिलांनी शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली. यावेळी सरकार आमचे म्हणणे ऐकून घेत नाही, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला. त्यानुसार, आज महिलादिन असून महिलांच्या सत्काराचे कार्यक्रम या सरकारकडून आयोजित केले जात आहेत. पण या महिलादिनी तुम्ही पाच मिनिटे महिलांच्या समस्या ऐकू शकत नाहीत. आम्हाला महिलांवर होणा-या अत्याचाराविरोधात मार्ग काढायचा आहे. त्यामुळे आमच्यासारख्या महिलांच्या समस्या ऐकून का घेत नाहीत, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.
रोहिणी खडसेंचे राष्ट्रपतींना पत्र
मागील काही महिन्यांपासून मुंबईसह राज्यभरातील अनेक भागांत महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एक मागणी केली आहे. ‘महिलांना खून करण्याची परवानगी द्यावी’, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी पत्राद्वारे केली आहे.