मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने सिनेविश्वात खळबळ उडाली आहे. रोहित शेट्टीच्या जुहू येथील बंगल्याबाहेर अज्ञात व्यक्तीकडून चार राऊंड फायर करण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होता. या हल्ल्याबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून लॉरेन्स बिश्नोई गँगने याची जबाबदारी स्विकारली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये शुभम लोणकर आरजू बिश्नोई नावाच्या व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
रोहित शेट्टीने आमच्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी गोळीबार केल्याचे म्हटले आहे. फेसबुकवर पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. ज्यामध्ये रोहित शेट्टीला आमच्या कामात हस्तक्षेप करू नका असे अनेक वेळा मेसेज करण्यात आले होते, परंतु त्याला ते समजले नाही. हा हल्ला एक ट्रेलर आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
सर्वांना राम राम जय बजरंग बली. शुभम लोणकर आरजू बिश्नोई आणि हरी बॉक्सर हरमन संधू यांनी आज चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील घरावर (शेट्टी टॉवर) झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली. आम्ही त्याला आमच्या कामात हस्तक्षेप करू नका असे अनेक वेळा मेसेज केले होते, परंतु त्याला समजले नाही. आम्ही त्याला हा छोटा ट्रेलर दिला आहे. जर पुन्हा आमचे शब्द समजले नाहीत तर त्यांना पुढच्या वेळी त्याच्या घराबाहेर नाही थेट त्याच्या बेडरूममध्ये गोळ्या घातल्या जातील. हा संपूर्ण बॉलिवूडसाठी एक इशारा आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पाच जणांना अटक
सूत्रांच्या माहितीनुसार, हल्लेखोर जुहू परिसरात दुचाकीवरून आला. त्याने रोहित शेट्टीच्या घरापासून थोड्या अंतरावर त्याची दुचाकी पार्क केली आणि शेट्टी टॉवरकडे चालत गेला. त्यानंतर आरोपीने इमारतीच्या दिशेने अनेक राउंड गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की गोळीबार करणारा एकच व्यक्ती होता. आरोपीने चार ते पाच राउंड गोळीबार केला. घटनेनंतर लगेचच जुहू पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी येऊन परिसराला वेढा घातला.

