22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरलंपास हायवाचे राज्य ठरले औटघटकेचे

लंपास हायवाचे राज्य ठरले औटघटकेचे

लातूर : विनोद उगीले
गौण खनिज मुरूमाची अवैध वाहतूक करणारा व महसूलच्या ताब्यातून लंपास झालेला हायवाची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात देऊन व याला आठवडा होऊन ही त्या हायवाचा शोध लागत नव्हता. पंरतू दैनिक एकमतच्या पाठपुराव्या मुळे या लंपास हायवाचे राज्य हे औटघटकेचे ठरले असून सोमवारी एमआयडीसी पोलीसांनी रायवाडी रोडवर गौण खनिजासह सदरील हायवास ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरून पळालेल्या व येथून हायवा लंपास करणा-या दोन चालकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तर या दोन्ही चालकांना सोमवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती ता मंगळवारी परत त्यांना न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. २६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शनिवार दि. ३ रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे हे लातूर विमानतळावरून तहसील कार्यालयाकडे जात होते. त्या वेळी त्यांच्या वाहनाच्या ताफ्याला एक हायवा एमएच २४ जे ९७४८ आडवा गेला. सदर वाहनाची चौकशी करण्याच्या सूचना तांदळे यांनी सोबतच्या अधिका-यांना दिल्या. त्या वेळी त्या हायवात अवैध प्रकारे भरलेला जवळपास ५ ब्रास मुरूम होता. त्याची रॉयल्टीही भरलेली नव्हती. यामुळे सदर वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात आणण्याच्या सूचना तहसीलदार तांदळे यांनी चालकाला दिल्या. हे ऐकताच सदर हायवा चालकाने वाहन तेथेच सोडून धूम ठोकली. त्या नंतर हायवाला तहसीलच्या पथकाने सील केले होते. दरम्यान, त्याच दिवशी शनिवारी दुपारच्या सुमारास तहसीलचे पथक हायवा ताब्यात घेऊन तहसील कार्यालय परिसरात लावण्यास गेले असता लावलेल्या ठिकाणी हायवा आढळून आला नाही. यामुळे मंडळ अधिकारी रामराव झाडे यांनी येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या वरून अज्ञाताविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात हायवा चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आठवडा उलटून ही तो हायवा एमआयडीसी पोलिसांना सापडत नव्हता. यामुळे या प्रकरणी जिल्हाभरात विविध शंका-कुशंका नागरिकांतून व्यक्त केल्या जात होत्या. या संदर्भात महसूल व पोलिस प्रशासनाकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडून शोध सुरू असल्याचेच सांगितले जात होते.  मात्र यासंबधी दैनिक एकमतकडून याचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. सोमवारी या लंपास हायवा प्रकरणी  महसूल व पोलीस प्रशासनाचे ‘तु कर मारल्यावनी मी करतो रडल्यावनी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच खडबडून जाग्या झालेल्या पोलीस प्रशासने सोमवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास लंपास हायवास राय वाडी रोडवरून ताब्यात घेतले.
घटनास्थळावरून पळालेल्या व तेथूनच हायवा लंपास करणा-या कैलास रमेय कांबळे रा. माऊलीनगर पाखरसांगवी व बालाजी बिटूराम पठाठे रा. एकुर्गा या दोन्ही चालकांना सोमवारीच अटक करून त्यांना न्यायालया समोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.  परत मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर पोलीसांनी हजर केले  असता न्यायालयाने त्यांना दि.  २६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे तपास अधिकारी पो.हे.कॉ. जी. एन. बिरादार यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR