मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधीची ऑडिओ क्लिप विधिमंडळात सादर केली असून, त्यामध्ये प्रश्न का लावायचा नाही, लावल्यानंतर काय होणार यासंदर्भात धमक्या असल्याचा दावा केला आहे. परिणय फुके यांच्या या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
परिणय फुके यांच्या मते, विरोधी पक्षातील काही आमदार आणि त्यांचे ७-८ जवळचे कार्यकर्ते या प्रकरणात सहभागी आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही ऑडिओ क्लिप सादर केली असून, फॉरेन्सिक चौकशी झाल्यानंतर पोलिस कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
परिणय फुके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकांवर राज्य सरकारने कारवाई केली होती. मात्र, ही कारवाई मागे घेण्यासाठी धमक्या देण्यात आल्या. तसेच, ‘‘लक्षवेधी लावून तुमच्या विरोधात पुन्हा कारवाई करू, तुमची राईस मिल बंद करू, तुम्हाला तुरुंगात टाकू,’’ असे सांगत पैशांची मागणी केली गेली, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांसमोर ऑडिओ-व्हीडीओ क्लिप सादर
परिणय फुके यांनी विधान परिषद सुरू होण्याच्या आधी राईस मिल धारकांनी त्यांना ऑडिओ आणि व्हीडीओ क्लिप पाठवल्या. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना हे पुरावे सादर केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले की, सभागृहात ही माहिती द्या, पण जोपर्यंत फॉरेन्सिक तपासणी होत नाही, तोपर्यंत कोणाचेही नाव घेऊ नका. या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.