जयपूर : वृत्तसंस्था
अखेरच्या चेंडूवर लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सवर दोन धावांनी विजय साकारला. अखेरच्या चेंडूवर राजस्थानला जिंकण्यासाठी तीन धावा हव्या होत्या, पण आवेश खानने फक्त एकच धाव दिली आणि लखनौने दोन धावांनी विजय साकारला. लखनौच्या संघाने दमदार फटकेबाजी करत २०४ धावा केल्या होत्या. पण यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी राजस्थानच्या संघाला झंझावाती सुरुवात करून दिली आणि त्यामुळेच राजस्थान विजय मिळवेल, असे वाटत होते. यशस्वी जयस्वालने ५२ चेंडूंत ७४ धावांची खेळी साकारली. पण त्याची ही खेळी वाया गेली.
विजयासाठी २०५ धावांचे आव्हान घेऊन राजस्थानचा संघ मैदानात उतरला खरा, पण त्यांना धडाकेबाज सुरुवात करून दिली ती पदार्पण करणा-या वैभव सूर्यवंशीने. कारण पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार लगावला आणि आपले इरादे स्पष्ट केले होते. एकामागून एक दमदार फटके तो मारत गेला आणि राजस्थानच्या संघाला ८५ धावांची सलामी करून दिली. पण त्यानंतर वैभव बाद झाला. पण वैभवने २० चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ३४ धावा करत सर्वांची मने जिंकली. वैभव बाद झाला पण यशस्वी मात्र झोकात फलंदाजी करत होता. यशस्वीने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि तो शतकाच्या दिशेने निघाला. पण मोक्याच्या क्षणी बाद झाला.
यशस्वीने या सामन्यात ५२ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७४ धावांची खेळी साकारली आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. त्यानंतर कर्णधार रायन पराग आणि ध्रुव जुरेल यांच्यावर संघाची भिस्त होती. पण त्याचवेळी पराग बाद झाला आणि सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेत पोहोचला. परागने यावेळी २६ चेंडूंत ३९ धावा केल्या. तो बाद झाला आणि राजस्थानच्या हातून सामना निसटला. पण शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात लखनौचा थरारक विजय झाला.