लखनौ : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील लोकबंधू रुग्णालयाच्या दुस-या मजल्याला सोमवारी रात्री १० वाजता अचानक आग लागली. पाहता-पाहता या आगीने उग्र रूप धारण केले. या मजल्यावर लहान मुले आणि महिलांचा आयएसयू वॉर्ड होता. आग भडकताच एकच गोंधळ उडाला. सर्वत्र धावपळ सुरू झाली. त्यामुळे आग लागलेल्या मजल्यावर ४० पेक्षा अधिक रुग्ण अडकले होते. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि अग्निशामक दलाने रुग्णांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. रुग्णालयातील जवळपास २०० रुग्णांना बाहेर काढून दुस-या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
रुग्णालयाच्या दुस-या मजल्यावर ४० रुग्ण होते. यातील बरेच रुग्ण आयसीयूमध्ये भरती होते तर रुग्णालयात एकूण २०० रुग्ण होते. रुग्णालयाच्या दुस-या मजल्याला आग लागताच एकच धावपळ उडाली. यावेळी रुग्णांना सुरक्षितरित्या हलविण्यासाठी डॉक्टरांसह सर्वच कर्मचा-यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. अग्निशामक दलाचे जवानही तातडीने दाखल झाले. त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नांतून २०० रुग्णांना तातडीने बाहेर काढून दुस-या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचविण्यात यश आले.