मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील सलमान आणि मुन्नीची भूमिका साकारलेली हर्षाली मल्होत्राच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले.
यानंतर आता ‘बजरंगी भाईजान २’ चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. सलमान खान आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली. या भेटीत त्यांनी ‘बजरंगी भाईजान २’ च्या संकल्पनेवर चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकल्पात दिग्दर्शक कबीर खान देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलमान, विजयेंद्र प्रसाद आणि कबीर खान यांचे त्रिकुट पुन्हा एकत्र येऊ शकते. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
‘बजरंगी भाईजान’च्या पहिल्या भागात सलमानसोबत करीना कपूर, हर्षाली मल्होत्रा, ओम पुरी, नवाजुद्दीन सिद्दीकी यांसारखे स्टार्सही दिसले होते. या चित्रपटाने भारतात ३२०.३४ कोटी रुपयांची कमाई केली होती आणि जगभरात ७०० कोटींहून अधिक व्यवसाय केला होता. आता या चित्रपटाच्या दुस-या भागाबाबत देखील चाहते आतुर झाले आहेत.
दरम्यान, सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असणारा ‘सिकंदर’ हा सिनेमा ३० मार्च रोजी रिलीज झाला. पहिल्या आणि दुस-या दिवशी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र तिस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईमध्ये काहीशी घसरण झाली. सध्या या चित्रपटाची भारतातील कमाई १०० कोटींच्या जवळपास पोहोचली आहे.