24.6 C
Latur
Wednesday, May 21, 2025
Homeअंतरराष्ट्रीयलष्करचा सहसंस्थापक आमिर हमजा घातपातात गंभीर जखमी

लष्करचा सहसंस्थापक आमिर हमजा घातपातात गंभीर जखमी

इस्लामाबाद/नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजा लाहोरमध्ये राहत्या घराजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

हा अपघात आहे की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सध्या लाहोरमधील रूग्णालयात त्याला दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याच्यावर गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे. या घटनेने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पण, पाकिस्तानी अधिका-यांनी मात्र या घटनेबाबत मौन बाळगले आहे.

हमजा हा लष्कर-ए-तोयबाच्या १७ संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. त्याला त्याच्या घरात झालेल्या अपघातात दुखापत झाली. सोशल मीडियावर काही अहवालांमध्ये हमजाला गोळी लागल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र चौकशीत या दाव्यांना खोटे ठरवण्यात आले आहे. २०१८ मध्ये, लष्करशी संबंधित जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन या संस्थांवर पाकिस्तान सरकारने आर्थिक निर्बंध घातल्यानंतर हमजाने लष्कर-ए-तोयबा पासून स्वत:ला दूर केल्याचे सांगितले जाते.

त्यानंतर त्यांनी जैश-ए-मनकफा नावाची वेगळी संघटना स्थापन केली, जी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया चालू ठेवण्यासाठी असल्याचा आरोप आहे. भारतीय प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, जैश-ए-मनकफा ही नवीन संघटना पाकिस्तानमध्ये कार्यरत असून, आमिर हमजा अजूनही लष्कर-ए-तोयबाच्या नेतृत्वाशी संपर्कात असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, पाकिस्तान सरकारकडून हमजाच्या प्रकृतीबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR