सातारा : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोष, भंडा-याची उधळण अन् लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री खंडोबा म्हाळसा यांचा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. संपूर्ण पालनगरी सोन्याची नगरी झाल्याचे पहायला मिळाले. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळयासाठी लाखो व-हाडी भाविक पाल येथे दाखल झाले होते.
परंपरेनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या सागवानी रथातून मिरवणुकीची सुरुवात झाली. फुले, तोरणे यांनी सजवलेल्या बैलगाड्यांतून खंडोबाची व-हाडी मंडळी तारळी नदीच्या तीरावर जाण्यासाठी निघाली प्रत्येक व-हाडी मंडळीच्या भाविक, वाद्यवृंद मंडळी यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदचा यळकोट असा गजर करत होते. गोरज मुहर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा पार पडला. यावेळी भंडा-याच्या उधळणीमुळे पाल नगरी सोनेरी झाल्याचे चित्र दिसून येत होते.

