लातूर : प्रतिनिधी
एका गुन्ह्यामध्ये अटक न करता नोटीस देऊन सोडून देण्यासाठी ३० हजारांची मागणी केली. संशय आल्याने ते स्वीकारण्याचे टाळले, याबाबत विवेकानंद चौक ठाण्यात पोलिस शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औसा तालुक्यातील भादा ठाण्यातील पोलिस शिपाई ज्ञानेश्वर विनायक जमादार (रा. कातपूर रोड, लातूर) याने तक्रारदाराकडे दाखल गुन्ह्यात अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी केली.
याबाबत लातूर एसीबीकडे १२ मार्च रोजी तक्रार केली. लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता ते स्वीकारण्याचे ठरले होते. तडजोडीअंती त्याने २० हजार रुपये स्वीकारण्याबाबत सहमती दर्शविली होती. त्यानुसार १३, १७ आणि २० मार्च रोजी सापळा लावला असता ज्ञानेश्वर जमादार याला संशय आला. त्याने लाच स्वीकारण्याचे टाळले. याबाबत लातूर येथील विवेकानंद चौक ठाण्यात २५ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती एसीबीचे पोलिस उपाधीक्षक संतोष बर्गे यांनी दिली.