मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गाजत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोव-यात सापडली आहे. ही योजना राज्यभरात गाजली. पण आता सरकारकडून लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. तसेच काही निकष लागू केले आहेत. या योजनेअंतर्गत यापूर्वी १५०० रुपये मिळणा-या काही महिलांना आता केवळ ५०० रुपये दिले जाणार आहेत. या बदलावरून विरोधकांनी सत्ताधा-यांवर टीकेची झोड उठवली आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सत्ताधा-यांवर जोरदार टीका केली आहे. लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत शून्य होईल, असे राऊत म्हणाले.
८ लाख लाडक्या बहिणींना आता १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपये देण्यात येणार आहेत. लाडक्या बहिणींकडून १५०० रुपयांच्या बदल्यात सत्ताधा-यांनी मते विकत घेतली. त्या मतांची किंमत आता ५०० वर आली आहे. उद्या त्याची किंमत शून्य होईल.
महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. सरकारकडे कर्मचा-यांचे पगार द्यायला पैसे नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीही आव आणला तरी, हे राज्य चालवणे आता आर्थिकदृट्या सोपे राहिलेले नाही.
गेल्या साडेतीन वर्षांमध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडल्याचे चित्र आहे. हे राज्य आता आर्थिक अराजकाच्या खाईमध्ये सापडले आहे. मी आणि अजित पवार बोलत जरी नसलो तरी, ते देखील चिंतेने ग्रासले आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे तक्रार केली. अजित पवार आमच्या फाईली मंजूर करत नाहीत. आम्हाला निधी देत नाहीत. आम्हाला निधी देत नाहीत, म्हणजे नेमकं कुणाला? असा प्रश्न आम्हाला पडतो. तुमच्यासोबत जे किती ५-२५ आमदार आहेत, ते सगळे गद्दार आहेत. ते फक्त पैसे आणि निधीसाठी तुमच्यासोबत आहेत. त्यांना फक्त राज्य लुटायचे आहे, आणि या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी त्यांना हवी आहे का? असा खोचक सवालही राऊत यांनी उपस्थित केला.