यवतमाळ : प्रतिनिधी
यवतमाळच्या रासा इथे नारीशक्ती मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबोधित करताना वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अजब विधान केले आहे. ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या चुलत बहिणी असल्याचे आमदार बोदकुरवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मेळाव्या दरम्यान आमदार बोदकुरवार मेळाव्यातील सर्व महिलांना पैसे मिळाले का असं विचारलं, तर ज्या महिलांना पैसे मिळाले नाही अशांना हात वर करायला लावले. यावेळी ३५ ते ४० महिलांनी हात वर केल्याने बोदकुरवार हबकले.
यावर बोलताना आमदार बोदकुरवार यांनी हात वर करणा-या महिलांनो तुम्ही माझ्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चुलत बहिणी आहात, पहिला सख्ख्या बहिणींचा विचार नंतर चुलत बहिणींचा विचार होईल असे अजब विधान आमदार बोदकुरवार यांनी केले. पण यानंतर त्यांनी ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांचा केवायसी चुकलं असेल, आधार चुकले असेल, तुमचे पैसे पुढच्य महिन्यात तीन महिन्यांचे एकदम येतील, काळजी करु नका अशी सारवासारव केली.