मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोट्यवधी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. १५०० रुपये याप्रमाणे पाच महिन्यांचे मानधन लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. अशातच आता महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु ‘लाडकी बहीण’ योजना कायमस्वरूपी सुरू राहणार अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत खुलासा केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत.
तसेच ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता-भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती! अशी पोस्ट मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे.
लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी सुरू राहणारी योजना आहे.. योजनेला महिलांचा प्रतिसाद बघून विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी केला आहे.