मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा २ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती ३ सदस्यीय असून, उर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे तर लाभ अदायगी प्रणाली ३ सदस्यीय समिती वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठित केली आहे. ही योजना राबवण्यासाठी नोंदणी आणि लाभ मिळण्यासाठी दोन वरिष्ठ अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून जबाबदारी देण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यासाठी आणि त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी अनेक समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. सुरुवातील अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.