अमरावती : प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून अनेक महिला आता अपात्र ठरल्या जात आहेत. आता निवडणूक आयोगाने यावर पारदर्शकपणे विचार करावा. ही योजना कशासाठी होती. अगोदर पात्र ठरवायचे की पैसे दिल्यावर पात्र ठरवायचे? हा मोठा प्रश्न आहे. हा क्राईम आहे, सरकारने गुन्हा केला आहे, याची चौकशी करणार का? आणि ती करावी, अशी मागणी माजी मंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली.
दरम्यान, महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या अर्जांच्या पडताळणीचा सपाटा लावला आहे. यातून लाखो लाभार्थी बहिणी अपात्र झाल्या आहेत. काहींचे पैसे देखील परत जमा करायला सुरुवात केली आहे, तर काही कारवाईच्या भीतीपोटी लाभ सोडत आहेत. महायुतीच्या या योजनेवर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. बच्चू कडू यांनी देखील यावर निशाणा साधला आहे.
या योजनेत डायरेक्ट नेत्याच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून, सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मत ओढण्याचा प्रयत्न झाला आहे. ही स्कीम लाडक्या बहिणींसाठी नव्हती, तर सत्तेत येण्यासाठी होती. सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणींची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.
तुम्ही निकष न पाहता त्यांच्या खात्यात पैसे टाकले. मग आता म्हणता की त्या पात्र नाहीत, मग पैसे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचे की पैसे दिल्यावर पात्र ठरवायचे? हा मोठा प्रश्न आहे. हा क्राईम आहे, सरकारने गुन्हा केला आहे, असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला.
लाडक्या बहिणींनो रस्त्यावर उतरा
महायुती सरकारने याच योजनेवर महिलांची मतं घेतली. मात्र आता त्यांचे पैसे बंद करणार ही त्यांची फसवणूक आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.