मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरल्याने महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. मात्र सहावा हप्ताही १५०० रुपयांचाच मिळाला त्यामुळे आता योजनेचा हप्ता २१०० रुपये कधी मिळणार अशीही चर्चा लाडक्या बहिणींमध्ये सुरू आहे.
दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या बहुतांशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला व दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला.
नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले होते. दरम्यान, आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणुका संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, डिसेंबरचा हप्ता दीड हजार रुपये देण्यात आला. त्यामुळे २१०० रुपयांच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सराकरने जुलै २०२४ मध्ये सुरु केली होती. लाडक्या बहिणींना जुलै ते डिसेंबर या कालावधीत ६ महिन्यांच्या कालावधीची रक्कम देण्यात आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना आतापर्यंत सहा हप्त्यांमध्ये ९ हजार रुपये मिळाले आहेत. राज्य सरकारला या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याचे पाहायला मिळालं होतं. महायुतीने निवडणूक प्रचाराच्या काळात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासने दिले होते.
२१०० रुपयांसाठी अर्थकसंकल्पाचा शब्द
नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला हप्ता १५०० रुपये दिले गेले, २१०० रुपयांसाठी अर्थकसंकल्पाचा शब्द देण्यात आला आहे. या दरम्यानच अपात्र लाभार्थी महिलांकडून त्यांना देण्यात आलेली रक्कम परत स्वीकारली जाणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या निकषांमुळे अपात्र ठरणा-या महिलांना २१००पये तर मिळणारचे नाहीत तर १५०० रुपये देखील परत द्यावे लागतील असे चित्र आहे.