मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी आता ई केवायसीच्या माध्यमातून आधारकार्डची पडताळणी करण्यात येणार आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने या संदर्भात आदेश जारी केले आहेत. पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात १८ सप्टेंबरपासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक केले.
दोन महिन्यात आधार प्रमाणीकरण करण्यात आले नाही तर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी २६ लाख लाभार्थी निकषानुसार पात्र नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कागदपत्रांची सूक्ष्म छाननी सुरु केली आहे त्याचाच एक भाग ई केवायसीच्या माध्यमातून प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.
या योजनेत अनेक पुरूषांनी तसेच सरकारी कर्मचारी-अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांनीही लाभ घेतल्याचे उघड झाले होते. त्यावर आता पात्र महिला लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
जूनपासून दोन महिन्यात ई-केवायसी बंधनकारक
या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून २ महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थींना ई-केवायसी करणे बंधनकारक राहील असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.