अहिल्यानगर : प्रतिनिधी
राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु करत दर महिन्याला दीड हजार रुपये खात्यात जमा केले जात आहेत. यामुळे महिलांना योजनेचा लाभ मिळत असताना दुसरीकडे मात्र शेतक-यांसाठी अडचणीचे होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शेती कामांसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा काढणी सुरु असून याकरिता मध्य प्रदेशातील मजूर आणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या कांदा काढणीची लगबग सुरू आहे. मात्र स्थानिक मजूर मिळत नसल्याने शेतक-यांसमोर मोठे संकट उभे राहिल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. परिणामी मध्यप्रदेशातून आलेल्या मजुरांच्या टोळ्या श्रीरामपूर तालुक्यात कांदा काढणीचे काम करत आहेत. परराज्यातून शेतमजूर आणावे लागत असल्याने मजुरांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी अधिकचा खर्च शेतक-यांना लागत आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी राज्यात शेतीच्या कामाला मजूर मिळत नाहीत अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी केली होती. याचा प्रत्यय ग्रामीण भागात फिरताना येतो आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या कांदा काढणीच्या कामांसाठी स्थानिक मजुरांची कमतरता भरून काढण्यासाठी थेट मध्यप्रदेशातून मजुरांच्या टोळ्या आल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगाव येथे शिवाजी पवार यांच्या शेतात मध्यप्रदेशातील हिरालाल अहिरे हा आपल्या ३४ मजुरांच्या टोळीनिशी कांद्याची काढणी करत आहे.
स्थानिक मजूर मागताय जास्त रोजगार
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून शेतमजूर मिळणे मुश्किल झाले आहे. स्थानिक महिला जास्त रोजंदारी मागत असल्याने अडचण निर्माण झाली होती. मध्य प्रदेशातून आलेल्या मजुरांमुळे आमची शेती वाचली आणि मोठं आर्थिक नुकसान टळले अशी प्रतिक्रियात कांदा उत्पादक शेतकरी शिवाजी पवार यांनी दिली आहे.