लातूर : प्रतिनिधी
अशुद्ध पाणीपुरवृठ्याच्या नावाखाली लातूर शहरात सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन हे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या वर्गवारीत मोडणारे आहे. हे आंदोलन अशुद्ध मनोवृत्तीतून केलेले असंस्कृत राजकीय प्रदर्शन असून या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी म्हटले आहे.
प्रशासनाने आपल्या कामकाजात सुधारणा करुन त्वरित शुद्ध पाणीपुरवठा न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागच्या काही दिवसांपासून लातूर शहरात नळाद्वारे पिवळ्या रंगाचे पाणी वितरित केले जात आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन लातूर शहर काँग्रेसने दि. १० एप्रिल रोजी लातूर शहरात आंदोलन केले. पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही त्यावेळी देण्यात आला होता. त्यानंतर दि. १६ एप्रिल रोजी काँग्रेस नेते, माजी मंत्री आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी स्वत: महानगरपालिकेत जाऊन प्रशासक व संबंधित मनपा पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी पाण्यातील शेवाळ आणि तीव्र सूर्यकिरणाचा संपर्क आल्याने पाण्याचा रंग पिवळा होत असला तरी ते पिण्यास योग्य असल्याचा खुलासा महानगरपालिका प्रशासनाने केला होता. तरीही स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशा सक्त सूचना आमदार अमित देशमुख यांनी लातूर मनपा प्रशासनाला केल्या होत्या. त्यानंतरही पाणीपुरवठ्यात फारशी सुधारणा झाली नाही.
केंद्रात आणि राज्यात भाजप युतीची सत्ता आहे. लातूर महापालिकेत प्रशासक आहे, म्हणजे सत्ता भाजप, महायुतीचीच आहे, असे असताना शुद्ध पाणीपुरवठा करावा, या जनतेने केलेल्या मागणीचा, काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा आणि स्वत: आमदार महोदयांनी केलेल्या सूचनांचा महापालिकेतील प्रशासन आणि भाजप युती सरकारवर काहीही परिणाम होत नाही. राज्याचे नगरविकास मंत्री, पाणीपुरवठा मंत्री, लातूरचे पालकमंत्री या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत, असे दिसून येत आहे.
राज्य शासनातील मंत्री आणि प्रशासनातील अधिकारी यांचा हलगर्जीपणा आपल्या अंगलट येतो आहे, हे लक्षात आल्यानंतर लातूर येथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या प्रवृत्तीचा प्रत्यय देत शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी लातूर शहरात आंदोलनाचा फार्स केला. अशुद्ध आणि विकृत मनोवृत्तीच्या काही भाजप कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदारांच्या प्रतिमेला जल अभिषेक करण्याचा करंटेपणाही यावेळी दाखवला. भाजपच्या या कृतीचा तीव्र निषेध करत असल्याचे अॅड. किरण जाधव यांनी म्हटले आहे.
एक महिन्याभरापासून लातूरमध्ये पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांनी तक्रारी केल्या, काँग्रेस पक्षासह इतर राजकीय पक्ष आणि संघटनांनी यावर आंदोलने केली. आमदार महोदयांनी बैठक घेऊन सक्त सूचना दिल्या, तरीही प्रशासन आणि शासन याकामी हलगर्जीपणा दाखवत आहे. ही वस्तुस्थिती असताना केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी कूटनीतीचा वापर करून या दूषित पाणीपुरवठ्याचा दोष सत्तेत नसलेल्या आमदारावर ढकलण्याचा प्रयत्न
होत आहे. ही बाब निषेधार्ह तर आहेच, परंतु जबाबदारीतून पळ काढण्याची कृतीही आहे. लातूरची जनता सुजाण आहे. भारतीय जनता पक्षाच्या अशा प्रकारच्या खेळ्या इतर ठिकाणी यशस्वी होत असतील, परंतु त्या लातूरमध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत. येथील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असेही त्यांनी निवेदनात
म्हटले आहे.