टायरचा स्फोट, आगीत व्हॅन मालकासह पत्नी, मुलगी जखमी
लातूर : प्रतिनिधी
स्कूल व्हॅनमध्ये घरातच एलपीजी गॅस भरताना अचानक आग लागल्याने २ स्कूल व्हॅन जळून खाक झाल्या आहेत. या दोन्ही व्हॅन दिलीप साळुंखे यांच्या मालकीच्या असून, या आगीत साळुंखे यांच्यासह त्यांची पत्नी आणि सहा वर्षांची मुलगी भाजली आहे. त्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात रात्री उशिरा यश आले.
स्कूल व्हॅनचे मालक दिलीप साळुंखे शहरातील न्यू भाग्यनगर भागात वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरीच व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरत होते. त्यावेळी अचानक आग लागली. गॅसमुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे दोन्ही स्कूल व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. आगीचा लोट घरात पोचल्याने काचा तडकल्या. तसेच टायरचे स्फोट झाले. त्यामुळे दिलीप साळुंखे यांच्यासह त्यांची पत्नी आणि ६ वर्षाची मुलगी भाजली आहे. आगीचा भडका उडाल्याचे कळताच शेजा-यांनी या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलास दिली. त्यानंतर अग्निशमनच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग लागल्याने या भागातील विद्युत पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.