लातूर : प्रतिनिधी
अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने यंदा प्रथमच शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आ.हे. हा महोत्सव डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होणार असून यानिमित्ताने विविध विषयांवर तयार झालेली भारतातील आणि विदेशातील शॉर्ट फिल्म्स पाहण्याची मेजवाणी लातूरकरांना मिळणार आहे. चित्रपट पहायचा कसा, याबाबत विविध उपक्रम घेऊन चिटपट कलेबाबत समाजात अभिरुची वाढविण्यासाठी अभिजात फिल्म सोसायटी कार्यरत आहे. फिल्म फेडरेशनअंतर्गत असलेल्या अभिजात फिल्म सोसायटीने आजवर अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. आता शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा महोत्सव लातूरमध्ये प्रथमच होत आहे.
शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंट्री, अॅनिमेशन, व्हिडीओ साँग या चार भागांत हा महोत्सव विभागण्यात आला आहे. यासाठी दि. २५ नोव्हेंबरपर्यंत आपल्या कलाकृती पाठवाव्यात, असे आवाहन अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानुसार आजवर १२० शॉर्ट फिल्म्स संस्थेकडे दाखल झाल्या आहेत. त्यात नेदरलॅडस्, अमेरिका, इंडोनिशिया, जर्मनी, आफ्रिका या देशांमधून आलेल्या प्रत्येकी १ शॉर्ट फिल्मचा समावेश आहे. पुढील चार दिवसांत आणखी शॉर्ट फिल्म येतील. त्या प्रेक्षकांना महोत्वात मोफत दाखविल्या जातील, असे अभिजात फिल्म सोसायटीचे आदित्य कुलकर्णी यांनी सांगीतले. या महोत्सवातील पहिले पारितोषी २१ हजार रुपयांचे आहे. द्वितीय पारितोषीक ११ हजार रुपयांचे असेल, अशी पारितोषीके प्रत्येक विभागात दिली लाणार आहेत, असेही ते म्हणाले.